नॉमीनी म्हणजे वारस नव्हे

तुमची बॅंक खाती, डिमॅट अकौंट यांना नॉमीनी लावणे पुर्वी ऐच्छीक होते. परंतू RBI व SEBI यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीनुसार तुमच्या बॅंक अकौंट्स, एफ.डी. व शेअर्स, म्युच्युअल फंड्स इत्यादी यांच्या डिमॅट अकौंट ला नॉमीनी लावणे बंधनकारक केले आहे.

नॉमीनी व नॉमीनेशन म्हणजे काय? साधारणपणे लोकांचा समज आहे की खातेधारकाचा चा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या खात्यावरील सर्व रक्कम / शेअर्स / मुच्युअल फंड्स / पॉलीसी ची रक्कम हे नॉमीनी ला मिळतात. हे काही अंशी बरोबर आहे. पण नॉमीनी ला मिळालेली रक्कम ही पुर्णपणे त्याची स्वतःच्या मालकीची नसते. तर नॉमीनी हा एक ट्रस्टी असून नॉमिनेशन मुळे मयत व्यक्‍तीच्या इतर कायदेशीर वारसांचे हक्क हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत. ही बाब मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच Shakti Yezdani V/S Jayanand Jayant Salgaonkar या केस मध्ये निर्णय देताना पुन्हा एकदा स्पष्‍ट केली आहे. (निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

वर उल्लेख केलेल्या केस मध्ये निर्णय देताना मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्‍ट केले आहे की, एखाच्या व्यक्तीची संपत्‍ती ही त्याच्या मृत्युपश्‍चात कोणाला मिळणार याबाबत वारसा कायदे अस्‍तित्‍वात आहेत. व नॉमिनेशन ची तरतूद ही वारसा कायद्यांपेक्षा वरचढ नसून नॉमिनेशन हा काही वारसाहक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीतीत हे आता पुन्हा एकदा स्पष्‍ट झाले आहे की, घर, जागा, शेअर्स, फंड, बँक, ठेव, इन्शुरन्स व इतर कोणत्याही बाबतीत मुळ मालकाच्या मृत्यु पश्‍चात नॉमीनी ला मयत व्यक्‍तीची संपुर्ण मिळकत, रक्कम इत्यादी मिळाली असल्यास तो त्या रकमेचा / मिळकतीचा मालक होत नसून ती रक्कम / मिळकत त्याला ट्रस्टी या नात्याने मिळाली असते व नॉमीनी ने त्याचे योग्य ते वाटप मयत व्यक्‍तीच्या सर्व वारसांमध्ये करणे अपेक्षित आहे. नॉमीनी ने तसे न केल्यास मयत व्यक्‍तीचे वारस त्या रकमेमधील / मिळकतीमधील आपला हिस्सा प्राप्‍त करण्यासाठी मे. कोर्टाकडे दाद मागू शकतात.

बॅंक खाते व डिमॅट खाते यांना नॉमीनी लावणे यापुर्वी बंधनकारक नसल्यामुळे नॉमीनेशन नसलेल्या खातेधारकाचा मृत्यु झाल्यास खात्यावरील रक्कम/ शेअर्स/ म्युच्युअल फंड्स कोणाला मिळणार याबाबत बॅंकेकडे बरीच गुंतागुंतीची कागदोपत्री प्रक्रीया करावी लागत होती. यामध्ये बॅंकांचा बराच वेळ वाया जात होता. परंतू नवीन नियमावलीनुसार सर्व खात्यांना नॉमीनी लावणे बंधनकारक केल्यामुळे आता बॅंकेने नॉमिनी व्यक्तीच्या नावे रक्कम/ शेअर्स/ म्युच्युअल फंड्स हस्तांतरित केले कि त्यांची जबादारी संपली. कारण वारस ठरविण्याचा अधिकार बॅंकेला नसून फक्त कोर्टालाच आहे. नॉमीनी ला मिळालेली सर्व रक्कम/ शेअर्स/ म्युच्युअल फंड्स इत्यादी मयत व्यक्‍तींच्या वारसांमध्ये वाटप करण्याची जबाबदारी नॉमीनीची असणार आहे. या प्रक्रीयेमध्ये बॅंकांवर कोणतीही जबाबदारी असणार नाही. नॉमीनी त्याचे योग्य ते वाटप न केल्यास मयत व्यक्‍तीचे वारस त्या रक्कम/ शेअर्स/ म्युच्युअल फंड्स यामधील आपला हिस्सा प्राप्‍त करण्यासाठी मे. कोर्टाकडे दाद मागू शकतात.

<< Back to Marathi Blogs